विशेष मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे डॉ. दिप्ती बच्छाव यांचा सल्लाः विशेष मुलांचे वात्सल्य मंदिर ‘ऑसम किड्स’चे उद्घाटन 

पुणे: ” ऑटिझम किंवा स्वमग्नता हा लहान मुलांमधील एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. अनेकदा अशा मुलांना मतिमंद समजले जाते मात्र हा चुकीचा समज आहे. ही जन्मस्थ अवस्था आहे. ही मुलेही सामान्य आयुष्य जगू शकतात. अशा वेळेस त्यांना समजून त्यांच्यातील कलागुणांना पारखून ते विकसीत करावे. या मुलांच्या जन्माबद्दल खंत बाळगण्यापेक्षा त्यांना स्विकारुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणावे.” असा सल्ला सुप्रसिद्ध डॉ. दिप्ती बच्छाव यांनी विशेष मुलांच्या पालकांना दिला.

एसीसीटीएस सोशिओ एज्यु वेलफेअर फाउंडेशनतर्फे पाषाण येथे स्वमग्न मुलांसाठी ‘ऑसम किड्स’ हे प्रशिक्षण व उपचार केंद्र उभारण्यात आले. याचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मानव कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.दिप्ती बच्छाव बोलत होत्या.

यावेळी अ‍ॅड. निलेश वरळेकर, मानासोपचार तज्ञ कृतिका पद्मनाभन, डीएक्सएन कंपनीचे संचालक डॉ. राजेश सवेरा आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी विभागाचे प्रमुख प्रतीक उपस्थित होते.

डॉ.दिप्ती बच्छाव म्हणाल्या,” या केंद्रात विशेष मुलांसाठी अ‍ॅक्युप्रेशर, स्पीच थेरेपी, जलोपचार सारख्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत. अशा मुलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांच्यातील कौशल्यांना प्रोत्साहन देऊन व्यवसाय प्रशिक्षण दिले जाईल. बाह्य जगात वावरणे सुलभ व्हावे यासाठी मुलांना दिवसभर चार भिंती आड न ठेवता त्यांना गार्डन, संग्रहालय, क्रीडा केंद्र, शाळा, वाचनालय यासह विविध ठिकाणाच्या भेटींचे आयोजन केले जाणार आहे.”

मानासोपचार तज्ञ कृतिका पद्मनाभन म्हणाल्या,”विशेष मुलांना, विशेषतः स्वमग्न मुलांना उपचार करून अथवा इतर कोणत्याही मार्गाने पूर्णतः सामान्य करता येणे शक्य नसते. मात्र त्यांचा स्वीकार करून योग्य व्यवस्थापनाद्वारे त्यांना स्वावलंबी जीवन जगण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण करता येते. त्यासाठी अशा मुलांच्या पालकांनी पुढाकार घ्यावा. यासाठी केवळ विशेष मुलांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही प्रशिक्षण आणि समुपदेशनाची गरज आहे.”

निलेश वरळेकर म्हणाले,” विशेष मुलांचे संगोपन करताना पालकांना तणावातून जावे लागते. त्यामुळे केवळ अशा मुलांना प्रशिक्षण देणे पुरेसे नसून पालकांनाही विशेष प्रशिक्षणाची गरज असते. ही गरज लक्षात घेऊन या केंद्रात विशेष मुलांसह त्यांच्या पालकांनाही प्रशिक्षित केले जाणार आहे. तसेच आर्थिक दृष्ट्या मागास घटकातील पालकांच्या विशेष मुलांच्या या केंद्रात सवलतीच्या दरात अथवा मोफत दाखल करून घेण्यात येणार आहे.”

डॉ. राजेश सवेरा म्हणाले,” स्वमग्न मुलांसाठी देशभरात १०० पेक्षा अधिक प्रशिक्षण केंद्र उभारू. यासाठी ऑसम किड्स हे केंद्र पथदर्शी प्रकल्प असेल.”

प्रतिक यांनी सांगितले की या प्रशिक्षण केंद्राबरोबरच महिला सबलीकरण आणि शेतकर्‍यांच्या समस्यांबाबात भारतात काम करणार आहे.

https://reportertodaynews.com/marathi/special-children-should-be-brought-into-the-mainstream-of-society-dr-dipti-bachhavs-advice-inauguration-of-vatsalya-mandir-awesome-kids-for-special-children

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© Ausum Kids 2024. All Rights Reserved.